पाणी दूषित नको म्हणून ‘एक गणपती’

Monday, 6 November 2017
गादेवाडीत दीडशे कुटुंबांचा निर्णय; दुष्काळी स्थितीसह टंचाईवर मात. खटाव - दुष्काळी परिस्थिती आणि भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन गादेवाडी (ता. खटाव) या गावाने घरगुती गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला. दीडशे कुटुंबे असलेल्या गावात दीडशे गणपती आणि पाच मंडळांचे पाच गणपती विसर्जन करायचे झाले तर उपलब्ध पाण्याचा साठा दूषित झाला असता. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्र मिळून संपूर्ण गावासाठी एकाच विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना केली आहे. गावातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमत दाखवून यावर्षी आलेल्या अस्मानी संकटाला दूरदृष्टीने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. गावाने घेतलेल्या या निणर्याचे खटाव भागातून स्वागत होत आहे. वळिवाच्या पावसाने यावर्षी या भागाला हुलकावणी दिली. मॉन्सूनचा पाऊस देखील अद्याप समाधानकारक झालेला नाही. थोड्याशा भुरभुरीवर या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तथापि पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. शेती सोडाच पण पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट समोर दिसत आहे. सध्या जे काही पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत, ते काटकसरीने वापरले पाहिजेत आणि हेच पाणी गणपती विसर्जनासाठी वापरले तर पिण्याच्या पाण्याचा गहन प्रश्न निर्माण होईल. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन यावर्षी घरगुती गणपती न बसवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याऐवजी प्रातिनिधिक रूपात सर्व गावचा मिळून एकच गणपती मुख्य चौकात बसवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.

गादेवाडीत दीडशे कुटुंबांचा निर्णय; दुष्काळी स्थितीसह टंचाईवर मात 

खटाव - दुष्काळी परिस्थिती आणि भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन गादेवाडी (ता. खटाव) या गावाने घरगुती गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला. दीडशे कुटुंबे असलेल्या गावात दीडशे गणपती आणि पाच मंडळांचे पाच गणपती विसर्जन करायचे झाले तर उपलब्ध पाण्याचा साठा दूषित झाला असता. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्र मिळून संपूर्ण गावासाठी एकाच विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना केली आहे. गावातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमत दाखवून यावर्षी आलेल्या अस्मानी संकटाला दूरदृष्टीने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. गावाने घेतलेल्या या निणर्याचे खटाव भागातून स्वागत होत आहे. 

वळिवाच्या पावसाने यावर्षी या भागाला हुलकावणी दिली. मॉन्सूनचा पाऊस देखील अद्याप समाधानकारक झालेला नाही. थोड्याशा भुरभुरीवर या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तथापि पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. शेती सोडाच पण पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट समोर दिसत आहे. सध्या जे काही पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत, ते काटकसरीने वापरले पाहिजेत आणि हेच पाणी गणपती विसर्जनासाठी वापरले तर पिण्याच्या पाण्याचा गहन प्रश्न निर्माण होईल. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन यावर्षी घरगुती गणपती न बसवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याऐवजी प्रातिनिधिक रूपात सर्व गावचा मिळून एकच गणपती मुख्य चौकात बसवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.

गणेशोत्सवाच्या काळात रोज सकाळी आणि संध्याकाळी ग्रामस्थ आरतीसाठी एकत्र येतात. आरती झाल्यानंतर ग्रामस्थ आगामी वर्षात राबवण्यात येणारी जलसंधारणाची विविध कामे व गावातील विविध समस्यांवर चर्चा करतात. पुढच्या वर्षी घरगुती स्वरूपात गणपती पर्यावरणपूरक बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच यावर्षी गावातील विविध मंडळांनी गणपती न बसवल्यामुळे जो खर्च वाचला आहे, ती संपूर्ण रक्कम जलसंधारणाच्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी देखील गावाने जलसंधारणाची अनेक कामे लोकसहभागातून केली आहेत. तथापि पाऊस नसल्याने ही झालेली ही कामे अद्याप कोरडीच आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय हा संपूर्ण राज्यालाच आदर्श ठरणार आहे.

आम्हाला सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा हा मर्यादित आहे आणि हे पाणी दूषित करून वर्षभर पाण्यासाठी आम्हाला आणि पर्यायाने आमच्या बायका-पोरांना दाहीदिशा फिरावे लागले असते. सण, उत्सवाच्या नावाखाली पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाचा इतर गावांनी आणि पर्यायाने मंडळांनीदेखील आमच्यासारखा विचार करण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या एक महिनाअगोदर आपण उत्सवाचे सर्व बाजूने नियोजन करत असतो. पण आता वेळ आली आहे ते सर्वप्रथम मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे याचे नियोजन करण्याचे.

- संतोष जाधव, उपसरपंच, गादेवाडी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News