कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठीही शेतकऱ्यांची उपासमार; सर्व्हर डाऊन!

Thursday, 31 August 2017

 

 

धर्माच्या नावावर झालेल्या युद्धांमध्ये किंवा लहानमोठ्या धार्मिक संघर्षांत आजवर किती माणसं मारली गेली असतील, याची विश्‍वसनीय मोजदाद अद्याप झालेली नाही. 15-20 कोटींपासून हे अंदाज सुरू होतात आणि शेकडो कोटींचे आकडे अधिकारवाणीसह सांगितले जातात. यातला कोणता आकडा खरा यावर वाद होऊ शकेल. धार्मिक संघर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कत्तली झाल्या हे निर्विवाद !...अशा संघर्षांना कुणी जिहाद म्हणायचे, कुणी शुद्धिकरण म्हणायचे तर कुणी ईश्‍वरी आज्ञेचे नाव घेऊन माणसांचेच शिरकाण करायचे, ही रीत...युगानुयुगे वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला मिळाली. ज्यू असणे, पॅलेस्टिनी असणे इथपासून ते दलित असणे, आदिवासी असणे हा गुन्हा ठरावा इतपत विखार आपल्या वांशिक-धार्मिक श्रद्धांनी पेरून ठेवल्याच्या नोंदी इतिहासाच्या पानांवर ताज्या आहेत. स्वरूप बदलले असेल, तीव्रता कमी-जास्त झाली असेल, पण माणसांसाठी तयार केलेल्या धर्म नावाच्या व्यवस्थेच्या वरवंट्यात असंख्य वेळा माणुसकीच चिरडली गेली.

इस्लामी जगताचे वर्तमान तर कमालीचे बीभत्स आहे. इसिस किंवा तालिबान ही नावे जगाला अशाप्रकारच्या जिहाद किंवा धर्मयुद्धांसाठी ठाऊक झाली. वास्तवात ही धर्मयुद्धे नसून, "अधर्मयुद्धे' म्हटली पाहिजेत. त्यांच्या कथित धार्मिक तत्त्वज्ञानात आणि कृतीतही माणुसकीचा, करुणेचा लवलेश नाही. सिरिया- इराकसह इस्लामचे प्राबल्य असलेल्या विश्‍वात धार्मिक उन्माद शिगेला पोचलेला आहे. तशी सध्या साऱ्या जगातच नवराष्ट्रवादाच्या नावाखाली धार्मिक उन्मादाला प्रतिष्ठाही मिळू लागली आहे. त्याला भारत अपवाद नाही. व्यापक स्तरावर नसेल, पण जो काही उन्माद भारतात सुरू आहे, त्यातून भारताचे नुकसान होणे ठरलेले आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिली तर भारतात भविष्यात धार्मिक संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढतील आणि सामंजस्य माघारेल तशी विकासाची गतीही संथ होत जाईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

धर्माची कास सोडणे आणि निरीश्‍वरवादाचा स्वीकार करणे हे या स्थितीवरचे उत्तर आहे की नाही, हे ठामपणे सांगता येत नाही. धर्मांच्या प्राबल्याला आव्हान देऊ शकेल, असे एक छोटेसे मानवतावादी परिवर्तन हळूहळू जगात अवतरते आहे, हे मात्र खरे. धर्माच्या गरजेवर या दुनियेने आजवर भरपूर मंथन केले. 'माणूस आणि पशू यांच्यातला फरक कायम राहायचा असेल तर धर्म हवाच', या मांडणीपासून ते 'धर्माने माणसाच्या डोळ्यावर झापड येते, त्याला गुंगी येते व तो अमानुष होतो' इथपर्यंत सारे डावे-उजवे धर्माच्या संदर्भात झाले. धर्माची गरजच नाही, अशी ठाम मांडणी करणाऱ्यांचे समूहही होऊन गेले. आजही आहेत. पण, धर्म हा आपल्या संस्कृतीत व त्यायोगे घरात-संस्कारात घुसल्यामुळे आपली कर्मकांडे व दैवतांभोवती फिरणाऱ्या साऱ्या गोष्टी म्हणजे धर्म असा बहुतेक सामान्य माणसांचा समज होतो. हा समज श्रद्धेचे स्वरूप धारण करतो आणि ही श्रद्धा त्या माणसांना मानसिक आधारही देते. या अशा प्रक्रियेला जगातला कोणताही मानवी समुदाय अपवाद नाही आणि त्यामुळेच राजकारण-सत्ताकारणात धर्माच्या वापराला आणि प्रसंगी माणसांच्याच शिरकाणातही राजकीय फायदे-तोटे पाहण्याच्या प्रवृत्तीला पायबंद राहिला नाही. सत्ताकारणात नीतिमत्तेला तशीही जागा नसतेच...धर्माचा आणि नीतिचा संबंध वरवर जोडला की राजकीय दुकान व्यवस्थित चालते.

आपला धर्म आपल्याला इतरांचा द्वेष करायला शिकवत असेल तर तो बदलण्याची वेळ आली आहे, असे समजावे म्हणतात. एकीकडे लोकसंख्येच्या प्रमाणात तसे साऱ्याच प्रमुख धर्मांचे अनुयायी वाढत आहेत. पण, यातही पारंपरिक धर्मांकडे पाठ फिरवून थेट नास्तिकता किंवा निरीश्‍वरवादाची कास धरणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून आले आहे. ज्यांना धर्मांच्या वर्तमान क्रूर अवतारांची चीड आली, अशा बऱ्याच लोकांनी थेट ईश्‍वराला नकार देऊन नास्तिकतेचा पंथ धरला. नॅशनल जिओग्राफिकच्या एका ताज्या सर्वेक्षणात प्रचंड प्रमाणात नसले तरी बऱ्याच प्रमाणात लोक निरीश्‍वरवादाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले. जो धर्म मानतो, त्याचा कोणता ना कोणता देव असतो आणि ज्याची देवावर श्रद्धा असते, ते पवित्र अंतःकरणाचा, दयाळू वगैरे असतो, हे मानवी समुदायाचे पारंपरिक समजही हळूहळू निकाली निघत चालल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. हे निष्कर्ष जगातील बहुसंख्य सश्रद्ध आणि धार्मिक लोकांच्या मानसिकतेच्या विरोधात जाणारे असले तरी ते माणुसकीच्या दृष्टीने चांगले म्हटले पाहिजेत.

    उत्तर अमेरिका आणि युरोपातल्या बहुसंख्य भागात ऍथेईज्म किंवा "नास्तिकता' ही दुसऱ्या क्रमांकाची धार्मिक ओळख ठरली आहे...म्हणजे पहिल्या क्रमांकावर ख्रिस्ती आणि दुसऱ्यावर थेट नास्तिक मंडळी! एकट्या अमेरिकेचा विचार केला तरी तब्बल 23 टक्के लोकसंख्या स्वतःला नास्तिक म्हणवते. याचा अर्थ हे लोक कोणत्याही देवाला मानत नाहीत आणि कोणत्याही धर्माचे अनुयायी नाहीत. 2007 च्या तुलनेत अमेरिकेत नास्तिकांची संख्या 6 ते 7 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. साधारणतः दशकभरापूर्वी निरीश्‍वरवाद्यांची संख्या अत्यंत तुरळक होती. आता ती एखाद्या धार्मिक समुदायाशी स्पर्धा करू शकेल, एवढी ठळक झाली आहे.

सध्या युरोपात फ्रान्स, न्यूझीलंड आणि नेदरलॅंडस्‌ या देशांमध्ये धर्मावर विश्‍वास नसलेल्यांची संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. हाच 'ट्रेंड' कायम राहिला तर काही वर्षांत ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचाही त्यात समावेश होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे... ती म्हणजे, जिथे धर्माच्या नावाखाली प्रचंड संघर्ष झाले किंवा होत आहेत, ते सारे 'धार्मिक' देश-प्रदेश हे मागासलेले, गरीब, निरक्षर, अस्वस्थ आहेत. जिथे धर्माच्या नावाने उन्मादी धिंगाणे चालतात, तिथे अन्याय, अनारोग्य, दारिद्रय आणि भूकेचे प्रश्‍न अधिक उग्र आहेत. भारत-पाकिस्तान-बांगलादेशसह आफ्रिकेतील अनेक देश याची उदाहरणे. जिथे धर्माच्या लढाया नाही किंवा कमी प्रमाणात आहेत, ते बऱ्यापैकी सुखवस्तू-श्रीमंत-समृद्ध आहेत. अधूनमधून आर्थिक ताणतणाव निर्माण होत असले तरी युरोप सधन आहे याचे कारण शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व जोपासण्याच्या त्या मातीच्या स्वभावात आहे. धार्मिकता कायम ठेवून धर्मवेडाला नाकारणारी मानसिकता हाही त्या मातीचा स्वभाव.

आफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशांत शांततामय सहअस्तित्वाला धर्माची पूर्वअट आहे. आफ्रिका खंडाचे उदाहरण घ्या. तिथे अनेक देशांत धार्मिक संघर्षांमुळे दशकानुदशके अस्वस्थता, रक्तपात सुरू आहे. कबिल्यांची, टोळ्यांची मध्ययुगीन संस्कृती आणि त्यात धार्मिक-वांशिक उन्माद. स्वाभाविकच मानवी हक्क, विकास, आरोग्य हे सारे आपसूक मागे पडते आणि रक्तपात सुरू असतो...शरीरात रक्त असेपर्यंत!

जिथे कुठे धर्माने रक्त मागितले, तिथे धर्माच्याच नावाने मानवाचे रक्त संपून गेले आणि त्याला मानवी कल्याणासाठी फारसे काही करता आले नाही. म्हणून आशिया आणि आफ्रिकेतल्या कित्येक देशांत मानवी प्रश्‍न शतकानुशतके तसेच राहिले. अतिरेकी धर्माचरण एकप्रकारच्या 'स्टुपिडिटी'ला (मूर्खपणा) जन्म देते, असे सिद्ध करणारी संशोधने उत्क्रांतीचा मानसशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी बऱ्याच वर्षांपूर्वी मांडली. निरीश्‍वरवाद हे त्या 'स्टुपिडिटी'विरुद्ध बंडखोरी करणारे दुसरे टोक. ते धर्माच्या प्रस्थापित व्यवस्थेला आणि त्यातील अमानुषतेला आव्हान देणारे आहे. नास्तिकतेलाही 'स्टुपिडिटी' म्हणणारे लोक आहेत...पहिल्या 'स्टुपिडिटी'ने माणसांच्या शिरकाणाला ईश्‍वरी सेवा मानले. ईश्‍वराचे अस्तित्व नाकारणारी ही 'स्टुपिडिटी' पारंपरिक धर्मश्रद्धेत माणुसकीचा प्रवाह पुनरुज्जीवित करणारी ठरो...मुर्खपणाच, पण तो कल्याणकारी ठरो!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News